आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद या संस्थेची स्थापना दिनांक १९/०४/२००३ रोजी झाली. संस्थेची सुरुवात ३०० मुख्य व्यवस्थापक आणि ३ लक्ष रुपये भागभांडवलापासून झालेली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. सहकाररत्न अंबादास मानकापे दादा यांनी ३०० सभासदांना घेऊन संस्थेची सुरुवात केली. संस्थेचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद जिल्हा असून संस्थेचे कामकाज सभासदांमधून लोकशाही पद्धतीने, ठरावाव्दारे सर्वसंमतीने चालते.
दर पाच वर्षानंतर लोकशाही मतदान पद्धतीने सभासदांमधून संचालक मंडळाची निवड करण्यात येते. संचालकांच्या निवडीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची निवड होते. संस्था सुरु झाल्यापासून दरमहा संचालक मंडळ सभा नियमित घेण्यात येतात आणि दर महिन्याचे संस्थेचे विषय यामध्ये मांडण्यात येऊन सर्व संचालक मंडळाची त्यास मान्यता घेण्यात येते. मगच ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येते. संस्थेच्या विकासाबाबतचे नियोजन ठरविले जाते.
संस्थेचे स्वतःचे कार्यालय होनाजीनगर येथे आहे व कर्मचारी निवासासाठी (राहण्यासाठी) अपार्टमेंट खरेदी केलेले आहे. आर.एल. पार्क सिल्लोड येथे शाखेची स्वतःच्या मालकीची इमारत असून, पिशोर आणि कन्नड येथे स्वतःच्या जागेवर कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सहकार विभागाने घोषित केलेल्या फळे व भाजीपाला विक्री केंद्र योजनेत संस्थेने शहरात विविध ठिकाणी असे केंद्र सुरू करण्यासंबंधी सहभाग घेऊन, स्वस्त भाजीपाला व फळे विक्री केंद्र सभासदांना सुरू करून दिलेले आहे. शासनाच्या उपक्रमात सहभाग घेत वेळोवेळी सहकार विभागाच्या कार्यक्रमांच्या व सूचनांच्या अंमलबजावणीसाठी आपला सहभाग मुख्य कार्यालय व इतर शाखा कार्यालयांमधून नोंदविलेला आहे.
सहकार विभागाच्या सूचनेनुसार संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार प्रशिक्षण देण्याचे काम संस्था दरवर्षी राबवते. संस्था दरवर्षी सहकार सप्ताह साजरा करते. सहकार सप्ताहामध्ये सहकार प्रबोधनाविषयी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. सभासद, ग्राहक यांना सहकाराचे ज्ञान व्हावे व सहकारात होणारे बदल त्यांना कळावेत यासाठी वेळोवेळी चर्चासत्रे आयोजित करण्यात येतात. संस्थेच्या माध्यमातून महिला बचतगटांना मार्गदर्शन करणे, बचतगट वाढविण्यासाठी शहर व ग्रामीण भागात प्रयत्न आणि त्यांना प्रोत्साहित केले जाते. सामाजिक उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या माध्यमातून नियमित वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे घेऊन त्याचे महत्वही पटवून देण्यात येते.